Saturday, November 13, 2021

रुचकर आस्वाद

पुणेकर माणुस खवैय्या आहे हे वेगळे सांगायला नको. जेवण म्हणजे फक्त उदरभरण हे पुणेकरांना मुळीच मान्य नाही. पुणेरी माणुस कुठेही गेला तरी तो खवैय्येपणा आपल्याबरोबर घेऊन जात असतो. त्याला मी सुद्धा अपवाद नाही.

२०१८ साली ऑगस्ट महिन्यात मी आणि माझे ४ चुलत भाऊ एका मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्याहुन दक्षिणेला श्रीविल्लीपुथूर (Srivilliputhur) पर्यंत रोडट्रीप करून आलो. जाताना थेट गेलेलो आम्ही येताना जमेल त्या ठिकाणांना भेटी देत निवांत परतलो. बंदीपूर अभयारण्यात सफारी करून आम्ही संध्याकाळच्या थोडे आधी बंगलोरच्या दिशेने म्हैसूर बंगलोर रस्त्याने निघालो होतो. काही अंतर गेल्यावर प्रचंड भुक लागल्याने आम्ही आता आसपास खायला काय मिळते हे पाहायला सुरुवात केली. त्यावेळी गुगल बाबा मदतीला आले आणि आम्ही बऱ्यापैकी रेटिंग असलेले हॉटेल शोधायला सुरुवात केली. पुजारीज फिशलँड नावाच्या हॉटेलला ऑनलाईन अतिशय चांगले रेटिंग असल्याचे दिसलं. त्यात मासे खायला मिळतील या उद्देशाने सर्वानुमते आम्ही पुजारीज फिशलँड नावाच्या हॉटेलला थांबायचे ठरविले. पण हॉटेल तसे अजून लांब होते आणि भुक तर जाम लागली होती. पण आमच्यातला खवय्या पुणेकर जागा झाला आणि पोट भरण्यासाठी मिळेल ते खायचे हे मनाला पटले नाही. मग ठरवले कि खायचे तर याच हॉटेलला.

बरेच अंतर कापुन तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं कि हॉटेल खूपच मोठे आहे. हॉटेलच्या प्रवेशदारावरच स्वागत करणाऱ्या मोठमोठ्या मुर्ती होत्या. मोठे हॉटेल्स नेहमी चवीला फाट्यावर मारून फक्त अँबियन्सचे पैसे घेत बसतात असा आमचा सार्वत्रिक अनुभव असल्याने आम्ही जरा साशंक झालो. संपुर्ण ट्रिपमध्ये जेवणाला खर्च झाले नसतील इतके पैसे इथे एकाच ठिकाणी खर्च व्हायला नको असे मनाला वाटुन गेले. आता आलोच आहोत तर बघु कस आहे असा विचार करून आम्ही हॉटेलमध्ये शिरलो.

हॉटेलचा अँबियन्स खुपच छान होता. बार, फॅमिली आणि आऊटडोअर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बैठक व्यवस्था फिरून आल्यावर आम्ही आऊटडोअर बैठक निवडली. आम्ही कधीही कोर्सनुसार जेवण करत नाही आणि बऱ्याचदा स्टार्टर पदार्थावर जेवण उरकत असतो. मेनूकार्ड पाहुन आम्ही प्रत्येकाला बांगडा मंग्लोरियन फ्राय ची ऑर्डर दिली. पहिल्यांदा एकच ऑर्डर आली, मग काय आम्ही सर्वांनी एकत्र त्यावर ताव मारला. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि चव भन्नाट असल्याचा नजरेनेच खुलासा केला.

कडाडून लागलेली भुक आणि सोबतीला चविष्ट जेवण मग कोण थांबतो कशाला. आम्ही बांगडा मंग्लोरियन फ्राय ४-५ वेळा रिपिट केले. नक्की एवढं खातंय कोण हे पाहायला कुतूहलाने बाकीचे वेटर आणि त्यांचा व्यवस्थापक आले. त्यांनी चौकशी करून आम्हाला इतरही डिश ऑर्डर करायचा आग्रह केला. तेव्हा आम्ही ओशाळलो आणि बाकी मेनू काय आहे हे पाहायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही प्रॉन्स आणि इतर फिश ऑर्डर केले, आणि सर्वच अप्रतिम होते. मुख्य म्हणजे जेवणाच्या दर्जाच्या मानाने पदार्थांचे दरही खुप नव्हते.

हॉटेल मालकाने मांडलेले जुन्या गाड्यांच्या कलेक्शन प्रदर्शनदेखील छान केले होते. आत जाऊन आम्ही हॉटेल मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली. थोड्याच वेळात हॉटेल मालक किचनमधुन बाहेर आले. त्यांनी जेवणाबद्दल आणि आमच्याबद्दल विचारपूस केली. आम्हीसुद्धा जेवणाची भरभरून स्तुती केली. माणुस साधा आणि सच्चा वाटला.

निघताना सहज आमची नजर हॉटेल बाहेरच्या बोर्डवर गेली तर तिथे लिहिले होते `पुजारीज फिशलँड इज पुजारीज फिशलँड, डु नॉट कम्पेर इट विथ ऑदर हॉटेल्स`. आम्ही तो बोर्ड पाहुन खळखळून हसलो. पण खरंच, आज कुठेही मासे खाल्ले तरी त्या हॉटेलशी तुलना होतंच नाही.

आमच्यातले काहीजण तर म्हणाले कि खास इथे खायला आपण पुण्याहून परत एकदा येऊ. अर्थात, अजून परत तिकडे जायचा योग यायची सर्वजण वाट पाहात आहोत.

विवेचन - भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया

झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

- कवी ग्रेस

खाली दिलेला अर्थ हा कवितेचा मला उमगलेला अर्थ आहे, कवीला अभिप्रेत असलेला मुळ अर्थ आणि इतरांना त्यात सापडलेला अर्थ यात तफावत असू शकते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी या गाण्यामागची मुळकथा माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितली आहे. त्यात त्यांनी शेवटी सांगितल्याप्रमाणे मोठ्या कवींची खासियत हि आहे कि त्यांच्या कवितांचे वेगवेगळे अर्थ निघत राहतात.

सदर कविता हि आई, वडिल, गुरु किंवा इतर मान्यवर वक्तीला संबोधुन असण्याची शक्यता जास्त आहे. सोयीसाठी आपण इथे कवितेचा नायक हा आईबद्दल बोलत आहे असे समजु. नायकाला आयुष्याचा झालेला अर्थबोध आणि आईची आठवण या संमिश्र भावना यातुन प्रकट झाल्या आहेत.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

प्रत्येक माणसाच्या मनात कोणते ना कोणते भय हे दडलेल असत. कधी ते अपयशाच तर कधी मृत्युचे. माणसाच्या मनातील भय हे एक क्षणदेखील त्याचा पिच्छा सोडत नाही. अशा क्षणाला नेहमी आपल्याला आपल्या आईची आठवण येते. आज नायकाची आई त्याच्या जवळ नाहीये आणि त्याच्या मनाला वाटून जात कि आई हवी होती. आईच असणं देखिल एक प्रकारचा आधार देऊन जात आणि मनातील भय नष्ट झाल्याची अनुभुती देतं तिच अपेक्षा नायक करत आहे.

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

असं म्हणतात कि माणसाचा अंतःकाळ जवळ आला कि त्याला शहाणपण येत आणि पूर्वी शिकलेल्या किंवा अनुभवलेल्या गोष्टींचा अर्थ लागायला लागतो. कवितेचा नायक आयुष्याच्या संध्याकाळच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे आणि त्याला याक्षणी त्या व्यक्तिने दिलेली शिकवण उपयोगी पड़त आहे जी त्याला पुर्वायुष्यात बहुदा मौल्यवान वाटली नसावी.

ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया

झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया

पूर्वी स्वार्थ बुद्धीने जगलेला नायक आता उघड्या डोळ्यांनी या जगाकडे पाहु लागला आहे. जणु त्याला आता साक्षात्कार झाला आहे किजीवन हे न संपणारे चक्र आहे. नायक चराचराशी आता एकरूप झाला आहे आणि सभोवताली असलेल्या गोष्टि त्याला शिकवत आहेत. तो झरे आणि धरणी कडे पूर्वीच्या नजरेने न पाहता एका नव्या दृष्टीकोनातून पाहात आहे. हे जे सर्व जीवित आहे त्याचा अंत आणि सुरूवात हि एकच आहे या अनुभवापर्यन्त येऊन तो आता पोहोचला आहे.

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

त्याच्या या अनुभव काळात त्याला आईने दिलेलं प्रेम हे निःस्वार्थ आणि निर्मळ असल्याची जाणीव होते. त्याची आई ज्या हळुवार आणि मृदुवाणीने नायकाला बाळ म्हणुन संबोधायची आणि त्याच्याशी हितगुज करायची हे तो आठवत आहे. तिच्याशी निगडित प्रत्येक गोष्ट त्याचे आयुष्य पावन करून गेली आहे. त्याची हि अवस्था वर्णन करण्यासाठी नायक पुराणकाळातील वनवासाला गेलेल्या सीतेचे उदाहरण देतो. वनवासात राम नसताना जसा त्याने दिलेला शेला राम सोबत असल्याची सीतेला जाणीव करून द्यायचा अगदी तसेच आईचे बोल त्याला या वनवासरूपी काळात साथ देत आहेत.

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

वास्तविक पाहता कोणत्याही स्तोत्रामध्ये अभिप्रेत देवतेचं गुणगान गायलेलं असत आणि सुखाची प्रार्थना केलेली असते. त्याप्रमाणे नायक आईचे स्तोत्राइतके पावन वर्णन करून गुणगान करत आहे पण हे करत असताना त्याच्या मनाला अतीव वेदना होत आहेत. आणि त्याचे दुःख तो लपवु शकत नाही. चांदणे जसे अनंत असते आणि आपल्याला ते संख्येत मोजता मोजता येत नाही तेवढे मोठे दुःख नायकाला झालेलं आहे.

चमत्कारिक योगायोग

साल २०२० च्या डिसेंबर महिन्यात माझा चुलत भाऊ आणि मी सासवड भागात फिरायला गेलो. चांगावटेश्वर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आणलेला डबा खात असताना तिरुपती बालाजी मंदिरातला लाडु खायची माझी तीव्र इच्छा झाली. येताना केतकावळे (प्रति बालाजी क्षेत्र म्हणुन प्रसिद्ध) गावाचा दिशादर्शक बोर्ड पहिल्याचा परिणाम म्हणता येईल. तिथेहि तिरुपती मंदिरासारखा मोफत लाडु प्रसाद मिळतो असे ऐकले होते (मी अजुन तिरुपतीला गेलेलो नाही)

मग काय ठरले कि ईथुन आता केतकावळेला जायचे. खराब रस्ता पार करत आम्ही केतकावळ्याला पोहोचलो. गाडी तळावर जाताजाताच कोणी लाडू हातात घेऊन येत आहे का किंवा खात आहे का हे पाहात होतो. 😂 पण कोणीच लाडू खाताना किंवा मिरवताना दिसत नव्हते. मनात शंका आलीच आणि तिथे गेल्यावर समजले कि कोरोनानंतर आता लाडू प्रसाद वाटप कायमचे बंद केले आहे.

आमची घोर निराशा झाली. आता तोंड लाडू खायला खवळले होते म्हणून आजूबाजूला पहिले पण फक्त एकाच ठिकाणी लाडु विक्रिला होते. आणि ते सुद्धा एकदम सुमार दर्जाचे होते. आम्ही तसेच मनात लाडवाची आस ठेऊन घरी बाणेरला निघुन आलो.

घरी येऊन फ्रेश झालो आणि हॉल मध्ये आलो तर आई म्हणाली “अरे शेजारचे काका तिरुपतीला जाऊन आले आज; काकु बालाजीचा प्रसाद देऊन गेल्या आहेत. बघ ओट्यावर ठेवलाय”. आणि बघतो तर काय तिरुपती बालाजीचा लाडु प्रसाद.

तिरुपती बालाजी आणि अन्नपुर्णा एकत्र प्रसन्न झाल्यासारखे वाटले. योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा, थोडक्यात काय तर इच्छा तीव्र असेल तर देवसुद्धा मदत करतो हे काही खोटे नाही. 😊

मला भेटलेला देवमाणुस

साधारण ९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमची आर्थिक परिस्थिती जरा बेताची होती. तेव्हा मी वाकडजवळ एका छोट्या स्टार्टअप कंपनी मध्ये काम करत होतो. कंपनीने मला कामासाठी नवीन मॅकबुक घेऊन दिला होता आणि त्याचे पैसे मी माझ्या पगारातून हळू हळू फेडायचे असे ठरले होते.एकंदर सुरुवात चांगली होती

रोज दोन बस बदलून मी ऑफिसला जात असल्याचे पाहून ६ महिन्यांपूर्वीच आजोबांनी त्यांच्या पैशातून मला नवीन युनिकॉर्न बाईक घेऊन दिली होती. त्या आधी मला बाईक चालवता येत नसल्याने मी नवीन गाडीवरच शिकण्याचे सोपस्कार पार पाडले.

तो दिवस छान होता. दुपारीच मला आठ हजार पगार जमा झाल्याचा मेसेज आला होता आणि मी खुश होतो. साधारण रात्री ९ वाजता मी काम आटपून घरी निघालो. बाईक चालवत मी विशालनगर जवळ आलो असता माझा फोन वाजला म्हणून मी गाडी थांबवली आणि फोनवर बोलून फोन ठेऊन दिला. गाडी पुन्हा चालू केली आणि काही मीटरच अंतर गेलो असेल तितक्यात भटक्या श्वान पथकाने माझ्या गाडी मागे धावायला सुरुवात केली. माझ्या डाव्या बाजूने श्वानांचा मोठा झुंड त्वेषाने गाडीवर चालून येत होता. नकळत मी गाडी उजव्या बाजूला तिरकी तिरकी चालवत गेलो आणि मागून येणाऱ्या एका कारला माझी गाडी घासून गेली. मी कसाबसा सावरलो. उडालेला तो गोंधळ पाहून श्वानपथकाने तेथून काढता पाय घेतला. ती कार पुढे जाऊन थांबली तसा मी पण तिच्या शेजारी जाऊन थांबलो. कारण कारचे बरेच नुकसान झाले असावे असा अंदाज होता. कारमधून चालक बाहेर आला. कारवरच्या पार्किंग स्टिकरवरून तो माणूस टेक महिंद्रा कंपनी मध्ये कामाला असल्याचे दिसले.

तो माणूस `अरे काय रे! कशी गाडी चालवतोस. काही लागले नाही ना?`

मी `नाही, काही लागले नाही...मी बरोबर जात होतो हो पण कुत्री माझ्या अंगावर आली आणि गाडी तिरकी गेली. मी तरी काय करणार`.

तो माणूस `अरे लागलं नाही म्हणुन ठीक पण माझ्या गाडीचे किती नुकसान झाले पहिले का?`

आम्ही दोघे त्याच्या गाडीजवळ गेलो तर दिसले की डाव्या बाजूचे दोन्ही दरवाजे चेम्बुन खोलवर ओरखडा आला होता. नुकसान तर बरेच होते आणि कमीत कमी ६-७ हजार खर्च आहे हे सहज दिसत होते (एवढ्या खर्चासाठी कोणी इन्शुरन्स वापरत नाही). माझ्याही गाडीचे खर थोडं नुकसान झालं होत पण ते कारच्या नुकसानीपुढे कमीच होत.

तो माणूस `आता काय करायचं सांग?`

मी एकदम गर्भगळीत झालो आणि हेल्मेट काढून उसासा घेतला. एकतर मी नवशिका चालक होतो आणि चुक तर माझीच होती. मनात विचार आला याने जर माझी बॅग उघडून पहिली तरी याला वाटेल कि मी एवढे महागडा लॅपटॉप वापरतो म्हणजे मी सगळा खर्च करायला पाहिजे. मी शांत खाली नजर घालून उभा होतो.

तो माणूस `बोल ना आता काय करायचं?`

उसने अवसान आणुन मी बोललो `मी दोन अडीच हजार देऊ शकतो, त्यापेक्षा नाही जमणार.`

तो माणूस `अरे पण नुकसान जास्त आहे. तीन हजार दिले तरी पण नाही भागणार.`

मी `हे बघा खरंच माझ्याकडे जास्त पैसे नाहीत. आणि जे आता मी देणार ते पण मला एटीएम मधून काढावे लागतील. आता लगेच देतो मी पैसे`

तो माणूस `इथे कुठे आहे एटीएम पण?`

मी ` आहे पुढे चला मी देतो. आणि हो हे हेल्मेट ठेवा मी पळून नाही जाणार`.

तो माणूस `हेल्मेट नको, तु चल पुढे मी येतो मागून`.

साधारण ४०० मीटर वर मी नशिबाला दोष देत गाडी चालवत एटीएम पर्यंत गेलो. गाडी थांबवून एटीम पैसे काढायला गेलो आणि तिथेच मला रडू कोसळले. कसबस सावरून पैसे काढून बाहेर आलो. तो माणूस गाडीतून उतरून माझी वाट पाहत उभा होता.

मी पैसे त्याच्या हातात दिले आणि त्याने ते मोजून घेतले. मोजून झाल्यावर त्याने शांतपणे ते पैसे माझ्या शर्टच्या खिशात ठेवले आणि बोलला

`पैसे राहू देत! विचार कर कि जर तुला काही झालं असत तर काय केलं असतंस. तुझा जीवसुद्धा गेला असता किंवा अपंग झाला असतास. गाडी व्यवस्थित चालवत जा बाकी काही नाही. खरंच तुला लागलं नाही ना?`

मी ` नाही काही लागलं नाही`.

मला अजून समजूतदारपणाच्या चार गोष्टी सांगून तो माणुस गाडीत बसून निघून गेला. मी थोडे थांबून हेल्मेट घातलं आणि देवाचे आभार मानत घरी निघालो.

आभार याकरिता मानले नाही कि माझे पैसे वाचले तर याकरिता कि मला त्या अपघातामध्ये काही झालं नाही म्हणून. तो देवमाणूस कोण होता ते माहित नाही. काही कृती खूप छोट्या असतात पण त्या आपल्याला आयुष्यभराचा धडा शिकवून जातात.

मी अनुभवलेला प्रभावी मॅनेजर

माझं इंग्रजी तोंडी संभाषण कौशल्य सुरुवातीला चांगले असले तरी एकदम प्रो म्हणावे असे काही नव्हते. पण माझी इंग्रजी लिखाणकला आधीपासूनच बऱ्यापैकी चांगली होती.

मला पहिली नोकरीसुद्धा माझं ईमेल लिखाणकौशल्य आवडल्यामुळे मिळाली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना या कलेचा फारच उपयोग होतो. कारण तुम्ही तांत्रिकदृष्ट्या कितीही सक्षम असलात तरी जर तुम्हाला कुशल संवाद साधता येत नसेल तर खुप चांगल्या संधी हातच्या निघुन जातात.आपण पाठवलेल्या मेसेजला/ईमेलला जर `नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे?` असा प्रतिसाद आला तर समजवून जावे कि आपण संभाषणात कमी पडत आहोत. कार्यालयीन संवाद हा रुक्ष जरी असला तरी त्यामुळे कोणी दुखावला नाही गेला पाहिजे हे खूप महत्वाचे असते.

माझ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात एका लहान कंपनीतुन झाली. साडेचार वर्षे तिथे काम केल्यानंतर आमची कंपनी एका मध्यम कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीमध्ये विलीन झाली. नवीन कंपनीमध्ये दोन महिन्यात पुण्यातच क्लाएंट साईडवर काम करण्याची संधी मिळाली. तिथे आमच्या कंपनीची टीम तिथल्या प्रॉडक्ट टीम बरोबर काम करणार होती.

टीम, प्रोजेक्ट आणि मॅनेजर सगळे काही नवीन होते. आम्हाला कुणाला एकमेकांबरोबर काम करण्याचा काही अनुभव नव्हता.

प्रोजेक्टच्या ज्या मोड्युलवर मी काम करणार होतो त्या तंत्रज्ञानाची माहिती आमच्या टीम मध्ये फक्त मला होती. तिथला आधीचा कोड एका परदेशी टीम ने लिहिला होता आणि त्या कोडची प्राथमिक चिकित्सा करण्याचे काम माझ्याकडे होते.

मी कोड पाहिला आणि माझ्या लक्षात आले की यामध्ये खूप गोष्टी उगीच किचकट केलेल्या आहेत तसेच कोड मध्ये खूप कमतरता आहेत. हे पाहून माझे डोके भणकले आणि त्या तिरमिरित मी परदेशी टीमला एक ईमेल लिहिला. टिम मधील सर्वांना त्या इमेल मध्ये मी सिसी केले.

आमच्या टीमचा मॅनेजर क्युबिकलमध्ये माझ्या मागेच बसत असे. दुसऱ्या दिवशी मी जरा लवकरच ऑफिसला आलो आणि पाहिले की मॅनेजर आधीच आलेला आहे. मॅनेजर एकाग्र होऊन काय वाचत आहे हे मी मॅनेजरच्या नकळत पाहिले. तेव्हा मला दिसले कि आमच्या क्लाएंट साईडच्या टीम मॅनेजरने माझ्या "त्या" ईमेल बद्दल एक मेल लिहिला होता आणि मला माझ्या ईमेल बद्दल समज द्यायला लावली होती. मॅनेजरचे लक्ष जाण्याआधी मी पटकन माझ्या जागेवर जाऊन बसलो.

मी माझा ईमेल चेक केला, तो ईमेल मला सिसी केलेला नव्हता. मी कालचा ईमेल उघडुन पुन्हा वाचला आणि मला तर समजले की खरंच मी चूक केली आहे. माझ्या ईमेलची भाषा हि कमांडिंग असुन समोरच्याला दुखावणारी आहे हे माझ्या लक्षात आलं.

थोड्याच वेळात माझ्या मॅनेजर ने मला हाक मारली. "शैलेश! इकडे येता का थोडावेळ?" (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्व लोकं एकमेकांना अरे तुरे करतात पण आमचा मॅनेजर सर्वांना आदरार्थी बोलत असे). पुढे काय वाढून ठेवले असेल याचा अंदाज घेत मी मॅनेजरकडे गेलो.

मॅनेजर "बसा इथे!" आणि मी काल केलेला ईमेल उघडला गेला.

मॅनेजर "आता हे वाक्य बघा, आपण हे अजुन दुसऱ्या प्रकारे कसे लिहु शकतो?" असे एक एक करून माझ्या संपुर्ण ईमेलची बिनटाका शस्त्रक्रिया झाली. आमच्या पूर्ण संभाषणात कोठेही "तुला काही कळत का? तू स्वतःला शहाणा समजतो का? तुला माहिती आहे का इथल्या मॅनेजर ने मला काय ईमेल लिहिला आहे?" असे कोणतेही वाक्य बोलले गेले नाही किंवा मी किती चुकलो आहे असे सांगण्याचा बॉसिंग वॉल प्रयत्न केला गेला नाही जे मला अनपेक्षित होते. माझी मलाच लाज वाटली. अशा प्रकारेसुद्धा फक्त ईमेलवरच नाही तर समोरासमोर प्रसंग हाताळले जाऊ शकतात हे समजले आणि मॅनेजर बद्दलचा माझा आदर आणखी वाढला.

माझ्या लिखाण कौशल्याच्या गर्वाचा वटवृक्ष एका क्षणात जळून खाक झाला होता. माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले होते. त्यानंतर मॅनेजरच्या आणि माझ्या कार्यालयीन आणि बिगरकार्यालयीन खूप चर्चा झाल्या पण त्यात या विषयावर कोणतीही चर्चा किंवा साधा उल्लेखही झाला नाही. अशा प्रकारचा मॅनेजर मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो. नाहीतर आरडाओरड करून मला दरडावुन न्युनगंड निर्माण करणे तेव्हा मॅनेजरला काही कठीण नव्हते.

मजेशीर गोष्ट म्हणजे या प्रसंगानंतर मी एकदा "उत्कृष्ठ ईमेल कसा लिहावा" या विषयावर एक कार्यशाळा अटेंड केली होती. तेव्हा आम्हाला सर्वांना विविध प्रसंग देऊन `अशा वेळी तुम्ही काय ईमेल केला असता` यावर लिखाण करायला सांगितले गेले. मोठ्या पटलावर एकाएकाचे ईमेल वाचुन वक्ता चुका दाखवून दुरुस्त करत होता. जेव्हा जेव्हा माझा ईमेल तिथे येई तेव्हा तो वक्ता बोले "यात काही बदल करण्याची गरजच नाही". असे तीन चार वेळा झाल्यावर त्याने विचारले की "हे ईमेल कोण लिहीत आहे? शैलेश कोण आहे?". मी हात वर केला. तो वक्ता बोलला "खर सांगू का? तुम्हाला या कार्यशाळेची गरज नाहीये. तुम्हाला कसं लिहायचं हे माहीत आहे." त्यावेळी फक्त मी स्वतःशी हसलो आणि मॅनेजर बरोबर घडलेला प्रसंग झरकन डोळ्यासमोरून तरळून गेला.

अशा मॅनेजरच्या हाताखाली घडलेले उद्याचे मॅनेजरसुद्धा नक्कीच इतरांना आपल्याला राबवायला दिलेला रिसोर्स म्हणुन न पाहता एक माणूस म्हणुन घडवतील.

प्रेमळ दरारा मावळला

९ मार्च २०२१ रोजी सकाळी काकांचा फोन आला आणि समजले कि पूर्वी आमच्या शेजारी राहणाऱ्या आजी आज सकाळी वारल्या. त्यांच्या ढासळत्या स्वास्थ्याबद्दल माहिती समजत होती पण इतक्यात असे काही होईल असे वाटले नव्हते. ऐकुन खूप वाईट वाटले आणि बालपणापासूनचा काळ आठवला.

गावात एखाद्या पाटलाचा दरारा असायचा तश्या त्या आजीच्या दराऱ्याच्या कथा गावभर प्रसिद्ध होत्या. त्यात आमचा बांधाला बांध. त्यामुळे बांधावरच्या शेजाऱ्यांचे जे `सख्य` असते तसेच आमचे पण होते. त्यांच्या वावरात (शेतात) बंगला उभा होता आणि आमच्या वावरात आमची चाळवजा घरे एका रांगेत उभी होती. जेव्हा जेव्हा आम्ही भावंडे क्रिकेट खेळत असु तेव्हा जादु झाल्याप्रमाणे आमचा बॉल त्यांच्या कुंपणातून आत हमखास जायचाच. मग त्या आजी कमरेवर हात ठेऊन रुक्मिणीस्वरूपात आमच्याकडे रागावून पहात असायच्या. आम्ही खजील होऊन तो बॉल मिळावा म्हणून विनवण्या करत असु आणि त्यावर पलीकडून ऐकायला मिळणारे संगीत आम्ही दुर्लक्षित करायचो. आम्ही त्यांच्या शेजारी कसं काय टिकलो याचं इतर लोकं आश्चर्य करायचे.

त्यांच्या कुंपणाला लागूनच आमचे चिंचेचं झाड होतं(अजुनही आहे). चिंच झोडताना आम्ही त्यांच्या बाजूला पडलेल्या चिंचा शून्यात जमा करायचो. पण कधी कधी धाडस करून आमची आजी त्या चिंचा घेऊन यायची. तेव्हाही थोडी कचकच व्हायची पण आजी ती दुर्लक्षित करायची. दर काही ठराविक दिवसांनी या ना त्या कारणांवरून थोडी थोडी शाब्दिक गोळाबारी चालूच असायची.

कालांतराने नियतीने आमची कठीण परीक्षा घेतली आणि पितृशोकानंतर आम्ही अभ्यास एके अभ्यास करू लागलो. अभ्यासाला अपुरा पडणारा वेळ आणि घरी भाजीच्या व्यवसायाची आईची असणारी गडबड यामुळे आम्ही घरी कमी आणि अभ्यासिकेत जास्त राहू लागलो. मधल्या काळात त्या आजीने भेटल्यावर वडिलांनंतर हातगाडी हातात घेऊन भाजी विकणाऱ्या माझ्या आईचे आमच्यासमोर खूपवेळा कौतुक करून आश्चर्यचकित केले. त्या आजीची हि दुसरी बाजू आम्हाला परिचित नव्हती.

नोकरीच्या काही वर्षानंतर अपुऱ्या पडणाऱ्या घरामुळे आम्ही एका चुलत भावाच्या फ्लॅट मध्ये भाड्यावर राहायला गेलो. त्या आजीसुद्धा त्याच सोसायटीमध्ये आमच्या समोर राहायला होत्या. तिथेही कोणीही त्या आजी बरोबर बोलायची हिम्मत सुद्धा करत नव्हते. जागा जरी बदलली तरी दरारा तोच होता. तिथे फ्लॅट विकत घेऊन राहणारे इतर लोकही त्या आजीला टरकून असायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आजीचा आमच्याबरोबर असणारा व्यवहार एकदम बदलला होता. कोणी इकडे तिकडे गाडी पार्क केली तर त्या आजी त्यांना खडेबोल ऐकवायच्या. पण जर ती गाडी आमच्या कोणी पाहुण्याची असेल तर त्या काही बोलायच्या नाही.

त्यांचे पहिले वाक्य हे आधीसारखेच ओरडून खडसावणारे असले तरी दुसऱ्या वाक्यात प्रेमळ चौकशी असायची. त्यांचा आम्हा भावंडांवर आणि माझ्या कष्टाळू आईवर असलेला जिव्हाळा लपून राहायचा नाही. मी जेव्हा नुकतीच दाढी वाढवायला सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी मला खडेबोल सुनावले होते आणि मी हसत वेळ मारून नेली होती.

मला मुले झाल्यावर ती सोसायटीच्या बागेत जेव्हा खेळायची तेव्हा त्या आजी सुद्धा तिथे असायच्या आणि माझी आई मला माझ्या मुलीने त्या आजींना प्रश्न विचारायचे धाडस केल्याचे कौतुक करायची. एखादा दिवस मुले खेळायला खाली गेली नाही तर त्या आजी काळजीने चौकशी करायच्या. मी नवीन फ्लॅट घेतल्याचे त्यांना जेव्हा समजले तेव्हा त्या मला म्हणाल्या `आता तू कसला येतो म्हातारीला भेटायला? आता तू माझ्या मयतालाच येशील`. त्यांचे ते वाक्य एकदम काळजात रुतून बसले. त्या म्हणायच्या कि मला तुझे नवीन घर पाहायला यायचे आहे पण नातू आणेल तेव्हा येईल. आणि खरोखरच त्यांनी हे त्यांच्या नातवालासुद्धा बोलून दाखवले. आम्ही नवीन घरी गेल्यावर ४-५ महिन्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे लांबतंच गेले. आणि त्या आजी सतत आजारी असल्याचे समजु लागले. लॉकडाऊन मुळे घरी आलेला माझा भाऊ आणि मी आवर्जुन त्यांना भेटायला गेलो. आम्ही भेटायला आल्यामुळे त्यांना झालेला आनंद त्यांनी लपवला नाही आणि मुलांची आपुलकीने चौकशी केली. उपचार आणि गोळ्या औषधांचा आता कंटाळा आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा नातु घेत असलेल्या काळजीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आई तेव्हा २-३ वेळा त्यांना भेटून आली. त्यांना खाल्लेलं काही पचत नव्हते आणि मध्यंतरी त्यांची तब्येत खूपच खालावत गेली.

आज त्यांचा देह अनंतात विलीन झाला आहे. तो दरारा आणि तो खडसावणारा आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. त्यांच्या काटेरीस्वभावामागील असलेला आपुलकीचा गोडवा आम्ही अनुभवला जो फार कमी लोकांनी अनुभवला असेल. आज थांबून बोलायला किंवा आठवणी काढायला कुणालाही वेळ नाही. तो क्षण आणि ती व्यक्ती परत कधीही येणार नाही हे आपल्या लक्षात येत नाही. शांत आणि आनंदी राहण्याची वेळ येण्याची आपण वाट पाहत बसतो पण ती वेळ आताच आहे हे सफाईदारपणे विसरतो.

राजगड किल्ल्यावरील ती एक रात्र

इंजिनिअरिंगला असतानाची गोष्ट आहे. २००४-२००५ चा काळ होता. आमच्या वर्गातल्या गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या मुलांनी राजगड किल्ल्यावर मुक्कामी जाण्याची योजना आखली होती. गिर्यारोहणाची फारशी माहिती नसलेला मी पण उत्साहात त्यात सामील झालो. एखाद्या किल्ल्यावर मुक्काम करायची हि माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मी आनंदात होतो.

आम्ही संध्याकाळच्या प्रहरी गडावर पोहोचलो. गडावर मस्त पावसाळी वातावरण होते. त्यावेळी बऱ्याचदा पद्मावती माचीवरील पद्मावती देवी मंदिरातच गिर्यारोहक मुक्काम करत असत. त्यादिवशी आमच्यासारखेच आणखी काही गिर्यारोहकांचे गट मुक्कामाला होते. आम्ही मंदिरात जिथे आमचे बस्तान मांडले होते तिथे खिडकीतून ढग आता शिरत होते, ते दृश्य अद्भुत होते. उजेड असे पर्यंत गडावर फिरण्याचा मस्त आनंद घेतला. रात्री सोबत आणलेलं डबे खाल्ले आणि गप्पा मारत मारत आम्ही निवांत ११ ला झोपलो.

रात्री अचानक मंदिराच्या दरवाजाची कडी कोणीतरी वाजवली. मला जाग आली आणि घड्याळ पहिले तर रात्रीचे २:३० वाजले होते. आमच्यापैकी बरेच जण जागे झाले होते पण कडी उघडायला कोणी गेले नाही. एका दुसऱ्या गटामधील मुलाने कडी उघडली. एक गिर्यारोहकांचा गट रात्री उशिरा गडावर आला होता. आम्ही थोडे पांघरून बाजूला करून पहिले आणि परत झोपलो. झोप लागते ना लागते तोच त्यांच्यापैकी एकजण आवाज करू लागला `आह आह आह हा...ओह ओह ओह हो`. एकतर पाऊस पडत होता आणि वातावरणात इतका गारठा होता कि सर्वांना वाटले कि याला चांगलीच थंडी भरली आहे. पण त्याचा तो आवाज वाढतच गेला. आणि थोड्या वेळाने तो बरळू लागला `सोडणार नाय! सोडणार नाय! लय दिवसांनी सापडलाय. सोडणार नाय!`. आमच्यातला धीट असलेला एक जण बोलला `झोपा रे हि उगाच नाटकी आहेत`. त्याचा हा ओरडण्याचा प्रकार थांबायचे काही नाव घेत नव्हता. त्यांच्या गटातील मुले पुढे येऊन त्याला विचारू लागली `महेश अरे महेश काय होतंय महेश?`. एव्हाना सगळे लोक उठून अंथरुणात बसून शांतपणे हे सगळं पाहत होते. यावर तो महेश (आता आम्हाला त्याचे नाव समजले होते) परत तेच सोडणार नायवाले बोल बोलू लागला. आम्ही पण हे सगळं नाटक आहे असे मानून बघत बसलो. देवीच्या मंदिरात कोणाला भूत लागू शकत नाही हा ठाम असलेला मी `शेजारी देव आहे, काही होत नाही` या विश्वासावर हे सगळे शांतपणे पाहत बसलो होतो.

आता मात्र तो महेश हातपाय झाडू लागला. त्यांच्या गटातील मुले त्याला आवरायला पुढे झाली तर त्या महेशने जोरात एकाला लाथ मारली आणि तो मुलगा थोडा दूर जाऊन भिंतीवर कोसळला. या सगळ्या झटापटीत त्या महेशच्या पायाला जखम झाली आणि रक्त येऊ लागले. तेव्हा आम्हला वाटू लागले कि हा नाटक करत नसावा. आता त्याच्या गटामधील मुले चिंतातुर झाली आणि त्याला बोलू लागली `महेश अरे महेश बघ बाहेर भाऊंची इंडिका आली चाल महेश`. याला दाद देईल तो महेश कसला. महेश आपला चालूच होता. `लै वर्ष झाली कोणी भेटला नाय`. आता इतर गटातील मुले सुद्धा यात सामील झाली आणि उपाय सुचवू लागली. कोणी सांगत होते देवीचा अंगारा लावा कोणी लिंबू उतरवायचे सुचवत होते. त्यात हि मुले कडेलोटाच्या रस्त्याने आले म्हणून हे असे झाले हि चर्चा सुरु झाली तर कोणी म्हणत होते ते येताना रात्री कच्च मांस घेऊन आले म्हणून असे झाले. जो तो आपापल्या परीने तर्क लावत होता तर कोणी उपाय सुचवित होते. पण कोणतेच उपाय काही काम करत नव्हते. शेवटी एकजण म्हटला "सकाळी ब्रम्ह मुहुर्तालाच याची सुटका होणार". आम्ही झोपी जायचा निर्णय घेतला आणि कसेबसे देवाचे नाव घेत निपचित पडून राहिलो.

सकाळी ६ वाजता जाग आली तेव्हा एक दोन मुले त्या महेशला घेऊन देवीच्या मूर्तीजवळ बसून होते आणि त्यांचे त्याला शांत करण्याचे प्रयत्न चालूच होते. मी पुन्हा झोपी गेलो आणि एकदम सकाळी ८ वाजताच उठलो. बरेचसे गट सकाळी लवकर उठून केव्हाच इतर माचींवर फिरायला निघुन गेले होते. आम्ही उठून आवराआवर केली आणि नाश्त्याला मंदिरातच बसलो. आता आमच्यातला जो तो त्या कालच्या प्रकाराची मस्करी करू लागला. `भाजी दे.. नाहीतर सोडणार नाय`. आणि नेमका तो कालचा महेश आमच्या शेजारीच झोपलेला होता याची जाणीव झाली. आम्ही नाश्ता आवरता घेतला आणि तिथून सटकलो. झाले ते खरे कि खोटे यावर आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या पण त्यातून ठोस निष्कर्ष काही निघाला नाही.

या प्रसांगानंतर मी ५ ते ६ वेळा राजगडावर गेलो. त्यात २-३ वेळा मुक्काम देखील केला ( एकदा तर रात्री ११ ला चढाई सुरु करून गडावर आलो) पण परत असला काही अनुभव आला नाही.

Friday, November 12, 2021

वर्क फ्रॉम होम

मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. कोरोना काळातच नाही तर साल २०१६ पासून मी वर्क फ्रॉम होम करत आहे. २०१६ साली मी ज्या कंपनी मध्ये रुजू झालो होतो ती कंपनी मुळातच रिमोट कंपनी होती त्यामुळे मला वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम ऍनीवेअरची मुभा मिळाली. तरीसुद्धा मी जास्तीत जास्त घरूनच काम करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले.

माझ्या एकुणच अनुभवाची खालीलप्रमाणे विभागणी करता येईल

  • कामाचे स्वरूप
  • काम करण्याची पद्धत
  • आकलन
  • लॉकडाऊनचा काळ
  • सारांश

कामाचे स्वरूप

कामाच्या वेळेबाबतीत कंपनी खूपच लवचिक होती. एखादे सॉफ्टवेअर वापरून मॉनिटरिंग वैगेरे सारखी भानगड नव्हती. फक्त तुम्ही दिवसाचे किमान ८ तास प्रोडक्टीव्ह काम करायचे असे होते (काम प्रोडक्टीव्ह झाले कि नाही याचे मोजमाप आपले काम आणि त्याचा दर्जा पाहून ठरायचे). बराचसा संवाद हा टीकेटवर किंवा आपण म्हणू शकतो लेखी स्वरूपातच व्हायचा. प्रत्यक्ष कॉल ची गरज क्वचितप्रसंगी पडायची. आठवड्याचे ४० तास पूर्ण करायचे एवढे टार्गेट होते आणि ते आठवड्यात कधीही केले तरी चालत होते. शनिवारी आणि रविवारी शक्यतो काम करू नये असे सांगितले जायचे.

काम करण्याची पद्धत

रुजू झालो तेव्हा समजलं कि ईतर लोकं दुपारी २ किंवा ३ च्या सुमारास कामाला सुरुवात करून रात्री थोडं उशिरापर्यंत करत असतात. माझा आहार आणि जीवनशैली काटेकोर असल्याने या कामाच्या अनैसर्गिक वेळा पाळणे माझ्याकडून होणार नव्हते. म्हणून मी सकाळी ९ च्या दरम्यान कामाला सुरुवात करत असे. सुरुवातीला फायदा म्हणेज घरी दुपारी घरच्यांबरोबर जेवण करता येत असे. पण काही दिवसांनी लोकांना वाटू लागलं कि मी घरीच आहे तर उपलब्ध आहे आणि मला कोणी पाहुणे किंवा मित्र आले तरी त्यांना वेळ द्यावा लागायचा. आणि ८ तास काम करण्याच्या प्रयत्नात मी दिवस दिवस काम करीत बसू लागलो. नंतर मी स्वतःहून यावर बंधने घातली आणि लोकांना `मला काम आहे` हे सांगण्याची धिटाई अंगिकारली.

घरूनच काम असल्याने कामाच्या ठिकाणचे मित्र यांच्याशी प्रत्यक्ष संवाद तुटला. ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांना तर मी वर्षानुवर्षे पाहिलेदेखील नव्हते ( भारतातील लोक सुद्धा). कामाशिवाय बोललेलं इतरांना एवढं आवडायचं नाही. जो तो आपले दिवसाचे ८ तास संपवण्याच्या मागे होता. पुण्यातील जे इतर लोक होते ते आणि आम्ही प्रत्यक्ष भेटायचे असे ठरविले आणि मीटअप वैगेरेला भेटणे होऊ लागले. आणि तेव्हा कुठे समजले कि आपण सगळे एकाच नावाचे प्रवासी आहोत.

आकलन

कालांतराने कंपनीने पुण्यात एक छोटंसं ऑफिस खोललं आणि लोकांनी जमेल तेव्हा तिथे येऊन काम करावं असा त्या मागचा उद्देश होता पण सक्ती नव्हती. घरापासून लांब असल्याने येण्यात आणि जाण्यात वेळ जायचा. असं वाटायचे तेवढेच जर घरून तास भरले तर लवकर काम संपवू. आणि तिकडे जाणे पण कमी असायचे. या सर्वात एक गोष्ट लक्षात आली कि कामाची जागा बदलत राहिली तर कार्यक्षमता वाढत आहे. म्हणजे एकाच ठिकाणी बसून काम करायचे नाही तर जागा बदलत राहायच्या.आणि हो अगदी घरात सुद्धा जागा बदलायच्या. दुसरी गोष्ट समजली कि कोणत्याही प्रकारची खुर्ची हि दीर्घकालीन काम करण्यासाठी योग्य नाही. खुर्च्यांमध्ये पैसे घालवून फायदा नाही याची जाणीव झाली. दिवसभर कधी खुर्चीवर, कधी बेड वर तरी कधी सोफ्यावर बसुन काम करायचं. त्यामुळे शरीरावर एकाच ठिकाणी ताण येत नाही. त्यात मग स्टँडिंग डेस्कची संकल्पना समजली. ती पण फायदेशीर आहे. पण दिवसभर उभे राहून पण काम करणे चुकीचेच आहे. थोडक्यात काय तर बदल करत राहायचे.

साधारण २ वर्षांनंतर असे वाटू लागले आता बास. मला सगळ्यांपासून ब्रेक पाहिजे आहे. अगदी घरच्या सगळ्यांपासून. मग चुलत भावांबरोबर मस्त ७-८ दिवस दक्षिण भारतात रोडट्रिप करून आलो आणि एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. होत काय तर आपण घरून काम करतो आणि आपल्याला वाटू लागत सुट्टीची गरज नाही. आपण सुट्ट्या पण टाळायला लागतो. सुट्टी घेतली तरी ती भरून काढायच्या दृष्टीने परत इतर दिवस जास्त काम करावे असे वाटायचे. हे अगदी चुकीचे आहे. आवर्जून सुट्ट्या घ्याव्यात नाहीतर मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. काही कारण नसताना सुद्धा सुट्टी घ्यावी आणि निवांत बसून राहावे.

साल २०१९ मध्ये मी कंपनी बदलली. ती कंपनी रिमोट नसली तरी तिथेही आम्हाला घरून काम करण्याची मुभा मिळाली. कामाचे स्वरूप आधीच्या कंपनीमध्ये होते तसेच राहिले. त्यात फारसा फरक पडला नाही. कोरोनाआधी ऑफिसला पण अधून मधून जायचो बदल म्हणून. बरे वाटायचे. तिथे ईतर टीम मधले काही लोक मित्र पण झाले.

लॉकडाऊन चा काळ

लॉकडाउन लागला आणि सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक घरून काम करायला लागले. जो तो मला म्हणून लागला `तुला काय सवय आहे. काही फरक नसेल पडत`. पण खरे पहिले तर ते तसे नव्हते. कोरोना आधी काम झालं कि फिरून ये, हॉटेलला जा किंवा एखादा कार्यक्रम असला कि त्याला जाऊन ये असे असायचे. हे लॉकडाउन मध्ये आजिबात नव्हते. लॉकडाउन मध्ये घरून काम करणे हि मुभा नव्हती तर सक्ती होती हे समजले तरी खूप आहे. घरून काम करण्याची सवय असल्याने इतर लोकांत आणि आमच्यात एक मूलभूत फरक होता कि आम्ही आमची उपलब्धता ठराविक वेळेत निश्चित केली होती.

घरी आहे म्हणून कधी पण काम कर असे आमचे नाही. त्यामुळे जेव्हा लोकं म्हणतात `कसं करतो रे तू घरून काम? आम्हाला तर कंटाळा आला आता` तेव्हा त्यांना मी सांगतो कि आता तुम्ही घरून काम करत आहे ते खर रिमोटवर्क नाही आहे. कोरोनासारख्या कठीण परिस्थिती मध्ये नोकरी जाईल या भीतीने लोक २४ तास काम करत आहेत. कंपन्यांना वाटलं आहे कि `वाह! हे मस्त आहे. लोकांची कार्यक्षमता वाढली आहे`. पण हे दीर्घकालीन टिकणारे नाही. आता बाजारात अनुभवी लोकांना नोकरीच्या खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे कंटाळलेले लोक आता जुन्या कंपनीला रामराम करून चांगल्या पगाराची नोकरी पकडू लागले आहे. आता लोक नोकरी जाईल म्हणून घाबरणार नाहीत. आणि मग कंपनी म्हणेल कि `गड्या आपलं ऑफिस बर!`.

सारांश

माझ्या आधीच्या कंपनीचा मालक आम्हाला सांगायचा कि बरीचशी लोक ऑफिसला जाऊन काम करतात म्हणून तुम्हाला रिमोट वर्क करायला जमत आहे. तुम्ही काही तिर मारलेला नाही. रिमोटवर्क सर्व प्रकारच्या लोकांसाठी आजिबात नाही. मी तर म्हणतो विकेंड संपवून सोमवारी ऑफिसला आल्यावर सकाळची कॉफी घेत कुठे कुठे फिरलो याचे फोटो दाखवून आणि किस्से सांगून मनाला आनंद द्यायला ऑफिसचे सवंगडी हवेतच. नाही का?

आठवणीतील दिवाळी

आम्हाला लहानपणापासून दिवाळीला किल्ला बनवायची भारी हौस होती. त्याची तयारी सहामाही परीक्षेचा पेपर देऊन आल्यावर त्याचदिवशी लगेचच चालू व्हायची. किल्ल्यासाठी लागणारी माती आणुन चाळण्याचे आणि दगड शोधुन आणायचे काम आम्ही इमाने इतबारे न थकता करत असू.

साधारण १९९७-१९९८ चा काळ असेल. त्यावेळी आमच्या दारालगत उंच ओटा होता आणि समोरच रस्त्यापलीकडे टेलरिंगचे एक दुकान होते. ओट्यावरच दाराशेजारी आम्ही किल्ला करत असु.

आम्ही भावंडांनी सुट्टी सुरु झाल्यापासून २-३ दिवस खपून मस्त किल्ला तयार केला होता. किल्ल्यावर पेरलेली अळीव उगवुन छान जंगल तयार झाले होते. दिवाळीसाठी २-३ दिवसच उरलेले होते. त्यादिवशी संध्याकाळी आई आणि आण्णा(वडील) हातगाडी घेऊन गेले होते. आम्हाला सर्वांना भेळ खायची इच्छा झाली. माझी बहिण भेळ आणायला दुकानात गेली. ती परत येताना जेव्हा ओट्याच्या पायऱ्या चढत होती तेव्हा तिच्या मागोमाग एक भला मोठा साप येत होता आणि नेमके ते दृष्य दुकानातुन टेलर मामांनी पाहिले. ओट्यावर येऊन तो साप सळसळ करत किल्ल्याच्या गुहेत शिरला. बहीण घरात आल्यावर टेलर मामांनी जोरात आवाज देऊन सांगितले कि किल्ल्यात साप गेला आहे आणि दरवाजा चांगला बंद करा. आम्ही दरवाजा बंद करून घरात मिळेल ते कापड लावून सापटी बुजवल्या.

बाहेर ओट्यावर हाहा म्हणता लोकांची मोठी गर्दी जमली, कोणीतरी आई आणि अण्णांना सुद्धा बोलावून आणले. गुहेत काठ्या ढोसून साप बाहेर येतो का हे पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण शेवटी सगळे लोक म्हणाले कि किल्ला तोडावा लागेल तरच सापाला पकडता येईल. दाराआड उभ्या असलेल्या आम्हाला एवढ्या घाबरलेल्या अवस्थेतही किल्ला तोडायला नको असे वाटत होते पण त्याला आता इलाज नव्हता. बाहेर किल्ला छिन्नविछिन्न केला गेला आणि सापाला पकडण्यात..नाही नाही मारण्यात लोकांना यश आले. विजयीमुद्रेने सर्व लोक चर्चा करत पांगले. आम्ही दार उघडुन बाहेर आलो आणि किल्ल्याकडे पाहुन आम्हाला रडूच कोसळले. आई आणि अण्णांनी आमची समजूत काढली. आमची मेहनत वाया गेली होती. ती दिवाळी आमची किल्ल्याविनाच गेली.

त्यादिवाळीनंतर आतापर्यंत दर दिवाळीला या घटनेची आठवण होते. तेव्हा किल्ल्याबद्द्ल खूप वाईट वाटले होते पण आता असे वाटते कि जर तो किल्ला नसता तर तो साप थेट दारातून घरात आला असता आणि पुढे काहीही होऊ शकले असते.

थोडक्यात म्हणायचे तर किल्लेदार उपस्थित नसताना देखील तो किल्ला आमच्यासाठी लढताना धारातीर्थी पडला होता.

संतुलीत आहार

सुरुवातीलाच सांगु इच्छितो कि मी स्वतः आहारतज्ज्ञ नाही आणि कोणत्याही आधुनिक आहार पद्धतीचा पुरस्कर्ता किंवा विरोधकही नाही.

संतुलित आहार ज्याला इंग्रजीमध्ये बॅलन्सड डाएट असे संबोधतात हा नावातूनच सर्वकाही सांगून जातो. शरीराला आवश्यक अशा सर्व गोष्टीचे संतुलित प्रमाणात सेवन करणे म्हणजे संतुलित आहार घेणे असे आपण थोडक्यात म्हणु शकतो. सध्याच्या युगात जीवनपद्धतीमुळे उद्भवलेल्या आजारांमुळे आहार नियमन करण्याला प्रचंड महत्व प्राप्त झालेले आहे आणि ते बरोबरसुद्धा आहे.

पूर्वापार चालत आलेले समाजातील पिढीजात व्यवसाय पाहिले तर एक लक्षात येईल कि पूर्वीचा आहार हा आपल्या व्यवसाय प्रकारावर जास्त अवलंबून होता. व्यवसायातील कष्टानुसार आणि कार्यपद्धतीनुसार आहारातील पदार्थ बनविले जात आणि त्याचे संतुलन राखले जाई. वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आणि संशोधनातुन हि आहारपद्धती विकसित झाली होती. आपण मराठी लोक मुख्यत्वे शेती व्यवसायात असल्याने आपला आहार हा शेतीसाठी लागणाऱ्या कष्टाला पुरक असा आहे.

गेल्या ४०-५० वर्षात आपले व्यवसाय आणि कामाचे स्वरूप कमालीचे बदलले आहे. पण त्यानुसार आपला आहार बदललेला दिसत नाही. आणि हि बाब अतिशय गंभीर आहे. आपण दिवसभर संगणकासमोर किंवा कार्यालयीन काम करणार असू तर शेतीच्या कष्टाला पूरक असा आहार आपल्याला फायद्याऐवजी तोटाच जास्त करून जातो. त्यामुळे आज कितीही घरातले वयस्कर लोक म्हणत असतील कि `आम्ही तुमच्या वयाचे असताना ४-४ भाकरी आणि त्यावर भरपूर भात खात असु` तरी ते आपल्याला आता अनुकरणीय नाही. त्यामुळे आहारात आपल्या जीवनपद्धतीनुसार केलेले बदल हे काही फॅड नसुन काळाची आणि शरीराची गरज आहे.

आपण मैदानी खेळ खेळत असू किंवा एखाद्या आजारावर उपचार घेत असू तर `काय खाऊ आणि काय खाऊ नको` हि गोष्ट पथ्यात मोडते आणि ती खूप महत्वाची सुद्धा असते. पण आज प्रत्येकजणच आहार नियमन करताना मी काय खाऊ आणि काय खाऊ नको याचा खुप विचार करतो किंवा गप्पा मारतो. आणि `मी किती खाऊ` याकडे साफ दुर्लक्ष करतो. कारण आजकालच्या `स्काय इज द लिमिट` मानणाऱ्या पिढीला कोणत्याही गोष्टीची सीमा मान्य नसते आणि कोणी ती घालायचा प्रयत्न केला तर ते बंड करून उठतात.

आपण पाहतो कि एखाद्या सुदृढ आणि धष्टपुष्ट व्यक्तीला लोक नेहमी प्रश्न विचारतात कि तू काय खातो. पण `किती खातो` हे मुद्दाम विचारत नाहित. आज व्हाट्सअँप फेसबुक सारख्या समाजमाध्यमातून लोक घरगुती उपायांचे डोस पाजत असतात. मग त्यात चमत्कारिक/गुणकारी अमुक किंवा आरोग्याला संजीवनी असलेले तमुक असे मेसेजेस सर्रास पाठविले जात असतात. जर कोणी म्हणाले कि आवळा आणि तुळशीची पाने आरोग्याला हितकारक आहे तर लोकांचा समाज असतो कि मग कितीही प्रमाणात खाल्ले तरी अपाय नाही. पण आवळा आणि तुळशीच्या पानांचे अतिसेवन आपल्या दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असु शकते याकडे कोणी लक्ष वेधत नाही. हीच बाब जिमला जाणाऱ्या तरुणाईने सुद्धा अनुभवली असेल. आमुक गोष्टीत प्रोटीन आहे तर खा बिनधास्त... पण किती? आणि जास्त खाल्ले तर त्याचे काय परिणाम होतील?

संतुलित आहार नेमका `काय खाऊ आणि काय खाऊ नको` बरोबर `किती खाऊ` या गोष्टीवर घाव घालतो. आहारात कर्बोदकांचे,स्निग्धाचे, प्रथिनांचे, तंतुमय पदार्थाचे आणि जीवनसत्वयुक्त पदार्थांचे प्रमाण किती असावे हे संतुलित आहार सांगतो. आहार हा ऋतूशी सुसंगत असावा. बाराही महिने एकच गोष्ट खाणे शरीरासाठी उपयुक्त नाही.

वजन कमी करायला चपाती आणि भाता ऐवजी भाकरी खाल्ली पण त्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार नियमित नाही केले तर तुमचे वजन कमी होणार नाही तर वाढतच जाईल. पिझ्झा किंवा वडापाव शरीराला अपायकारक जरी सांगितले असले तरी एक पिझ्झाची स्लाईस किंवा एक झणझणीत वडापाव तुम्हाला वजनदार बनवून जाणार नाही. खरा प्रश्न आपण किती खातो याचा आहे.

संतुलित आहाराचे महत्व सांगायचे झाले तर आहार संतुलित नसणे म्हणजे विविध रोगांना निमंत्रण आहे. आमुक तमुक सेलिब्रिटी किंवा फिटनेस मॉडेल हे खातो म्हणून मी पण तेच खातो असे करणे हानिकारक ठरू शकते. आपल्या जीवनपद्धतीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार संतुलित आहार ठरवण्यासाठी आपल्याला आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज भासते. आपला आहार हा संतुलित असावा आणि कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन टाळणारा असावा हे खूप महत्वाचे आहे. तसेच आपला आहार नैसर्गिक असावा आणि त्यात उगाच विदेशी गोष्टी खाण्याचा अट्टाहास नसावा जेणेकरून आपण त्या संतुलित आहारचे दीर्घकाळ पालन करू शकु.

रुचकर आस्वाद

पुणेकर माणुस खवैय्या आहे हे वेगळे सांगायला नको. जेवण म्हणजे फक्त उदरभरण हे पुणेकरांना मुळीच मान्य नाही. पुणेरी माणुस कुठेही गेला तरी तो खवैय...