९ मार्च २०२१ रोजी सकाळी काकांचा फोन आला आणि समजले कि पूर्वी आमच्या शेजारी राहणाऱ्या आजी आज सकाळी वारल्या. त्यांच्या ढासळत्या स्वास्थ्याबद्दल माहिती समजत होती पण इतक्यात असे काही होईल असे वाटले नव्हते. ऐकुन खूप वाईट वाटले आणि बालपणापासूनचा काळ आठवला.
गावात एखाद्या पाटलाचा दरारा असायचा तश्या त्या आजीच्या दराऱ्याच्या कथा गावभर प्रसिद्ध होत्या. त्यात आमचा बांधाला बांध. त्यामुळे बांधावरच्या शेजाऱ्यांचे जे `सख्य` असते तसेच आमचे पण होते. त्यांच्या वावरात (शेतात) बंगला उभा होता आणि आमच्या वावरात आमची चाळवजा घरे एका रांगेत उभी होती. जेव्हा जेव्हा आम्ही भावंडे क्रिकेट खेळत असु तेव्हा जादु झाल्याप्रमाणे आमचा बॉल त्यांच्या कुंपणातून आत हमखास जायचाच. मग त्या आजी कमरेवर हात ठेऊन रुक्मिणीस्वरूपात आमच्याकडे रागावून पहात असायच्या. आम्ही खजील होऊन तो बॉल मिळावा म्हणून विनवण्या करत असु आणि त्यावर पलीकडून ऐकायला मिळणारे संगीत आम्ही दुर्लक्षित करायचो. आम्ही त्यांच्या शेजारी कसं काय टिकलो याचं इतर लोकं आश्चर्य करायचे.
त्यांच्या कुंपणाला लागूनच आमचे चिंचेचं झाड होतं(अजुनही आहे). चिंच झोडताना आम्ही त्यांच्या बाजूला पडलेल्या चिंचा शून्यात जमा करायचो. पण कधी कधी धाडस करून आमची आजी त्या चिंचा घेऊन यायची. तेव्हाही थोडी कचकच व्हायची पण आजी ती दुर्लक्षित करायची. दर काही ठराविक दिवसांनी या ना त्या कारणांवरून थोडी थोडी शाब्दिक गोळाबारी चालूच असायची.
कालांतराने नियतीने आमची कठीण परीक्षा घेतली आणि पितृशोकानंतर आम्ही अभ्यास एके अभ्यास करू लागलो. अभ्यासाला अपुरा पडणारा वेळ आणि घरी भाजीच्या व्यवसायाची आईची असणारी गडबड यामुळे आम्ही घरी कमी आणि अभ्यासिकेत जास्त राहू लागलो. मधल्या काळात त्या आजीने भेटल्यावर वडिलांनंतर हातगाडी हातात घेऊन भाजी विकणाऱ्या माझ्या आईचे आमच्यासमोर खूपवेळा कौतुक करून आश्चर्यचकित केले. त्या आजीची हि दुसरी बाजू आम्हाला परिचित नव्हती.
नोकरीच्या काही वर्षानंतर अपुऱ्या पडणाऱ्या घरामुळे आम्ही एका चुलत भावाच्या फ्लॅट मध्ये भाड्यावर राहायला गेलो. त्या आजीसुद्धा त्याच सोसायटीमध्ये आमच्या समोर राहायला होत्या. तिथेही कोणीही त्या आजी बरोबर बोलायची हिम्मत सुद्धा करत नव्हते. जागा जरी बदलली तरी दरारा तोच होता. तिथे फ्लॅट विकत घेऊन राहणारे इतर लोकही त्या आजीला टरकून असायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आजीचा आमच्याबरोबर असणारा व्यवहार एकदम बदलला होता. कोणी इकडे तिकडे गाडी पार्क केली तर त्या आजी त्यांना खडेबोल ऐकवायच्या. पण जर ती गाडी आमच्या कोणी पाहुण्याची असेल तर त्या काही बोलायच्या नाही.
त्यांचे पहिले वाक्य हे आधीसारखेच ओरडून खडसावणारे असले तरी दुसऱ्या वाक्यात प्रेमळ चौकशी असायची. त्यांचा आम्हा भावंडांवर आणि माझ्या कष्टाळू आईवर असलेला जिव्हाळा लपून राहायचा नाही. मी जेव्हा नुकतीच दाढी वाढवायला सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी मला खडेबोल सुनावले होते आणि मी हसत वेळ मारून नेली होती.
मला मुले झाल्यावर ती सोसायटीच्या बागेत जेव्हा खेळायची तेव्हा त्या आजी सुद्धा तिथे असायच्या आणि माझी आई मला माझ्या मुलीने त्या आजींना प्रश्न विचारायचे धाडस केल्याचे कौतुक करायची. एखादा दिवस मुले खेळायला खाली गेली नाही तर त्या आजी काळजीने चौकशी करायच्या. मी नवीन फ्लॅट घेतल्याचे त्यांना जेव्हा समजले तेव्हा त्या मला म्हणाल्या `आता तू कसला येतो म्हातारीला भेटायला? आता तू माझ्या मयतालाच येशील`. त्यांचे ते वाक्य एकदम काळजात रुतून बसले. त्या म्हणायच्या कि मला तुझे नवीन घर पाहायला यायचे आहे पण नातू आणेल तेव्हा येईल. आणि खरोखरच त्यांनी हे त्यांच्या नातवालासुद्धा बोलून दाखवले. आम्ही नवीन घरी गेल्यावर ४-५ महिन्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे लांबतंच गेले. आणि त्या आजी सतत आजारी असल्याचे समजु लागले. लॉकडाऊन मुळे घरी आलेला माझा भाऊ आणि मी आवर्जुन त्यांना भेटायला गेलो. आम्ही भेटायला आल्यामुळे त्यांना झालेला आनंद त्यांनी लपवला नाही आणि मुलांची आपुलकीने चौकशी केली. उपचार आणि गोळ्या औषधांचा आता कंटाळा आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा नातु घेत असलेल्या काळजीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आई तेव्हा २-३ वेळा त्यांना भेटून आली. त्यांना खाल्लेलं काही पचत नव्हते आणि मध्यंतरी त्यांची तब्येत खूपच खालावत गेली.
आज त्यांचा देह अनंतात विलीन झाला आहे. तो दरारा आणि तो खडसावणारा आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. त्यांच्या काटेरीस्वभावामागील असलेला आपुलकीचा गोडवा आम्ही अनुभवला जो फार कमी लोकांनी अनुभवला असेल. आज थांबून बोलायला किंवा आठवणी काढायला कुणालाही वेळ नाही. तो क्षण आणि ती व्यक्ती परत कधीही येणार नाही हे आपल्या लक्षात येत नाही. शांत आणि आनंदी राहण्याची वेळ येण्याची आपण वाट पाहत बसतो पण ती वेळ आताच आहे हे सफाईदारपणे विसरतो.
No comments:
Post a Comment